सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२

सिद्धांत

क्षणोक्षणी कणकण जगण्याची धडपड
तुझीही -माझीही ..
ढासळते आहे माती , निखळतो आहे एकेक दगड..
हलक्याशा आघातानंही कोसळत आहेत आतल्याआत
मनाच्या ठिसूळ झालेल्या असंख्य भिंती..
पत्त्यांचे बंगले हलक्याशा झुळुकेने कोसळावेत,
तितक्या सहजपणे विखुरून जातोय कणनकण..
त्याच त्या अवशेषांवर कितींदा उभारायचं स्वतःचं अस्तित्व ?
आशांचे अंधुक कवडसे मावळून गेलेले
स्वप्नांचे फिनिक्स फार मागेच राखेत कायमचे दफन झालेले,
तरीही ही कोणती धुगधुगी घेऊन जगतो आहोत ,
समजत नाही.
डार्विनचा सिद्धांत कितींदा सिद्ध करतो आपण
जगण्याच्या धडपडीतून आणि ती शमतानाही ... !
- डॉ. सुनील अहिरराव 

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

मुक्ती

जन्मासोबत मी घेऊन येतो
आयुष्याशी जन्मजन्मांतरीचे वैर आणि
आत्मघातांचे मयुरपंखी शाप.



तुझ्या कांकणांचे हळवे संगीत विरून गेल्यावर

क्षणाक्षणाला भोगतो मी माझे मरण.

मी पहुडतो स्मशानस्थ शांततेत

स्थितप्रज्ञासारखा माझ्याच सरणावर



आणि

आयुष्याच्या कणाक्षणाचा
सारा अंगार ओतून मीच मला जाळत राहतो
निमुटपणे मुक्तीची वाट पहात..

नंतर
तुझ्या आसवांची उष्ण गाथा
आणि तुझ्या थरथरत्या ओठांतील दु:खाचा अस्फुट उद्गार ,
शांततेच्या कणाकणाला छेदत जातो.

मी माझ्या ओठांनी हलकेच टिपून घेतो तुझी आसवे!
तुला ते कळतं की नाही, माहित नाही;
पण त्या सरत्या क्षणी मी पाहिलेले असतात
तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांचे मुक्त पक्षी !


डॉ.सुनील अहिरराव

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

क्षण कोसळते...

कोण कुठल्या क्षणांचे क्षणाक्षणाला बदलणारे अनंत संदर्भ मेंदूत भरून जगत असतो आपण ! कुठून कसा ,कुठला क्षण कालौघातून ओघळेल आणि कोसळेल आपल्यावर, सांगता येत नाही. त्या क्षणाच्या कोसळण्यावर आपल्या अस्तित्वाचा डोलारा उभा असतो. तो कोसळेपर्यंत वाट पाहणे इतकेच आपल्या  हाती... इथेच आशा नव्याने जन्म घेत जाते. त्या येणाऱ्या क्षणात कदाचित असणार असतो आपले कोसळते अस्तित्व सांभाळणारा एक दीपस्तंभ ! मात्र एक निश्चित की त्या त्या क्षणांना आपण रोखू शकत नाही. .पुन्हा नव्या संदर्भांचे ओझे घेऊन एक प्रवास सुरु राहतो ... त्या त्या क्षणांच्या कोसळण्याची वाट पाहणे इतकेच आपल्या हाती ! त्याने जे दान तुम्हाला दिले ,ते निमुटपणे स्वीकारण्याशिवाय पर्याय तरी कोणता ?

सुखाला जसे विविध रंग असतात, तसेच दु:खाच्याही अनंत छटा... ! प्रत्येकाचं दु:ख मोठं  आणि परद:ख शीतलं ..आपल्या दु:खाला श्रोता मिळू शकतो पण आपल्या स्वतःशिवाय दुसरा सोबती मिळत नाही. ती तीव्रता आपली आपण भोगायची : कधी सुन्न,बधीर व्हायचं; कधी हुंदके देऊन रडायचं, कधी निगरगट्टपणे कोरडेपणाने आपल्याच दु:खावर भीषण हसायचं ! आपल्या इवल्या डोळ्यांइतकच आपलं आकाश...त्यात जमतील तशा वेड्यावाकड्या रेषा आखायच्या.  काही आकृत्या ,चित्रे रेखाटायची..ती सुद्धा अंगावर धावून येणारी..त्याच एब्स्ट्राक्ट आकारांत हरवून जायचं आणि त्याच त्या रेषांच्या रिंगणात फिरत रहायचं दरक्षणी कोसळत्या नव्या क्षणाच्या प्रतीक्षेत ! सगळंच म्हटलं तर आखीवरेखीव म्हटलं तर सगळंच विस्कळीत ...

असे असंख्य गुंते आणि त्यांची वेडीवाकडी भेंडोळी जमा करत चाललो आहोत आपण. कधी सुटलेच गुंते तर - वरवरचे वाटतात सुटल्यासारखे ; बहुधा हे सुद्धा तितकेसे खरे नाहीच ! एक धागा उकलताना नकळत त्याचा एक नवा गुंता ,एक नवे भेंडोळे तयार होते. आयुष्य म्हणजे साऱ्या क्षणांच्या संदर्भाचं एक मोठं भेंडोळं आणि आपण त्यात अडकलेले क्षुद्र जीव. अचानक हे धागे कधी स्वतःच उकलले जातातही ... क्षणांचे, वर्षांचे संदर्भ उलटून गेल्यावर नामोनिशाणही उरत नाही. ही उकल होण्यासाठी पुन्हा त्या क्षणाच्या कोसळण्याची वाट पाहणे ; मात्र ती तशी होणे न होणे त्या त्या क्षणावर अवलंबून... ! त्या क्षणाच्या बरसल्यानंतरचा प्रतिक्रियेचा क्षण तरी आपला असतो का, प्रश्नच आहे कारण एखादा  क्षण कोसळताना मिटवून जातो  आपलं असणं, तेव्हा पुढचा क्षण वाट्याला येत नाहीच...मग एक अनंत प्रवास अपरिहार्यपणे...

- डॉ. सुनील अहिरराव





सोमवार, १६ जुलै, २०१२

अंधार

अंधार..

सभोवती नितळ ,निखळ, काळाभोर अंधार ..
खिडक्यांचे आकाशी नेत्रही झाकलेले.
मी पीत राहतो
तिमिराचे बर्फाळ गहिरेपण आणि
साठवत राहतो माझ्या मनातील तारे निखळल्यानंतरचे रितेपण !



शांतता भिनत जाते

अंधाराच्या कणाक्षणात अंगभर, काही क्षण..


 मग काळजात लख्खकन् चमकून जातं धारदार पातं-


 तुझ्या चेहऱ्यावरील अंधारवस्त्र सारून 



मी न्याहाळतो
तुझे संगमरवरी वासनांतीत नग्न सौंदर्य..

तू ओथंबत्या नजरेने सामावून घेतेस मला माझ्या तिमीरछटांसह ,
 अलगद ; फुलपाखराला कवटाळावे तसे.
 विवस्त्र शांततेत तुझ्या कांकणांचे संगीत,
ओठांची थरथर 
 आणि श्वासांतील बेधुंद आवेग-
 तुझ्या रक्तात पाझरतात माझे रंग, गंध, श्वास आणि रक्तही..
 आपण वाहत राहतो एकमेकांत आपले स्वत्व
 आणि शोधत राहतो
 अद्वैत !

तुझ्या नकळत माझी स्वप्ने तुझी होतात
 अन् माझ्या डोळ्यात सप्तरंगी आभास येतात.
 सभोवती नितळ ,निखळ काळाभोर अंधार..

डॉ.सुनील अहिरराव

गुरुवार, २८ जून, २०१२

इष्टापदा

पोळलेल्या माणसांचे काय सांगू,
पेटल्या मंत्रालयाचे काय सांगू

वाद नाही, काय ते आक्रीत होते !
आपदा इष्टापदांचे काय सांगू

धड धडा ह्या फायली साऱ्या जळाल्या
गूढ होते काय त्याचे , काय सांगू

 सोडला नि:श्वास त्यांनी दाटलेला
 दैव  होते थोर त्यांचे , काय सांगू

वाचले ते नेमके होते पुढारी,
जीव गेले माणसांचे  ! काय सांगू

संविधाना,  झोप की हे सोंग यांचे 
मानभावी  लांडग्यांचे , काय सांगू
    _डॉ. सुनील अहिरराव

गुरुवार, ३१ मे, २०१२

एकटेपण

जेव्हा
आपलं असं कुणीही नसतं,
तेव्हा सोसता येतो एकटेपणा
एक अनिवार्य सत्य म्हणून !

आणि
साहता येतो
मनाच्या उदार भिंतींचा कोसळता आक्रोश
मनाच्याच सांदीकोपऱ्यात पिशाच्याप्रमाणे,
निर्विकार..

इथे
मनाच्या स्मशानात
स्तब्ध शांत काळोखात पेटत जाताहेत
आत्मघाती चिता -
अंधाराला डागण्या देत प्रसवताहेत
दु:खाची चिवट पिलावळ...

आताशा
तुझ्यामाझ्या मिसळत्या श्वासांतूनही
प्रकटत नाही अद्वैत !
होत नाही आताशा
तुझ्या ओठांच्या आणि डोळ्यांच्या सीमारेषेवरील सत्य , एक !

पापण्यांतील खाऱ्या पाण्यात
उरलीय नुसती धग;
नाही सोसवत आता
तुझ्या मिठीतले माझे एकटेपण ...!
_डॉ.सुनील अहिरराव

बुधवार, २८ मार्च, २०१२

रक्तबंधन

पिढ्यापिढ्यांतून अस्तित्वाच्या वहात येतो रक्तप्रवाह
दलदलीतून प्रवृत्तींच्या नहात येतो रक्तप्रवाह

गाळ तळाशी टाकून देणे अजून त्याला जमले नाही,
पूर्णत्वाने सांडून जाणे अजून त्याला गमले नाही

क्षणक्षणाने कणाकणाला भारीत जातो रक्तप्रवाह
कणाकणाने क्षणाक्षणाला पेरीत जातो रक्तप्रवाह

हळवेपण वाहतो कधी, कधी केशरी भडक रक्त
कधी विसरुनी नाती गोती ,सांडित जातो अपुले रक्त

प्रवाहातील हा दोष नाही, आहे फक्त स्वभावस्पंदन
प्रवाहाला हा शापही नाही, आहे केवळ रक्तबंधन !

_ डॉ. सुनील अहिरराव
पूर्वप्रकाशित : दै. गावकरी ,नाशिक

फिनिक्स

भावनांतील दुबळा गुंता आपणालाच गुंतवू जातो
तुटली स्वप्नं, किनारा छिन्न- आपणासवे वाहून नेतो


वाहतो असे: पागल पिसे ,कणाकणाला विखरु जातो
सांडती कण नुरते भान, अज्ञातातील प्रदेश येतो.


गहिरागार गूढ अंधार  : अस्तित्वातील अर्थ सांगतो
राखेतून या  कलेवराच्या जीवनसाक्षी फिनिक्स होतो !


- डॉ.सुनील अहिरराव
पूर्वप्रकाशित (सकाळ,नाशिक )

शुक्रवार, २३ मार्च, २०१२

रक्तक्रंदन

कणाकणाचे साहून क्रंदन, गतकाळाचे तोडून बंधन
काळ धावतो अपुल्या वेगे, गर्भक्षणाचे जोडून बंधन

क्षण एकेक तुटत जातो ,कालौघातून सुटत जातो,
स्वतः रेखिल्या दिशांत केव्हा, स्वतःच आणि विरून जातो...

विरून गेल्या श्वासांच्याही, हरवलेल्या दिशांच्याही,
काळावरती खुणा ठसती, स्वप्नामधल्या आशांच्याही.

गर्भक्षणाची रेखित गती ,कणाकणाची जपत स्मृती,
काळ असाच जात राहतो , अवशेषांना देत सोबती.

पुन्हा एकदा अवशेषांतून फुलून येते नवीन जीवन
काळाच्या अन कणाक्षणावर पुन्हा एकदा रक्तक्रंदन...!

_डॉ.सुनील अहिरराव
पूर्वप्रकाशित-रविवार सकाळ 
७ मे १९९५ नाशिक

बुधवार, २१ मार्च, २०१२

डायरी

आजवर
तू खूप सहन केलंस-
माझं सारं दु:ख
साठवून ठेवलंस
तुझ्या पानापानांवर...

मी
इतरांच्या
तनामनावर गोंदलेली
सुखंसुद्धा
पुसून गेलीत....

शनिवार, १७ मार्च, २०१२

वादळ

वादळ येते :
आकांतासह विरून जाते.
आणि शांतता:
वादळाला पेरून जाते !

वादळ म्हणजे
प्राक्तनाचा जहरी फास...
आणि शांतता:
आयुष्याचा उसना श्वास !

_डॉ. सुनील अहिरराव

शुक्रवार, १६ मार्च, २०१२

जीवन

तू म्हणालीस -
जीवन म्हणजे मौज आहे.
रात्रीच्या चांदण्याची झालर लेवून
प्रत्येक दिवस येत आहे.
स्वप्नावर स्वप्न फुलते आहे,
मनाच्या झुल्यावर झुलते आहे.
आनंदाच्या अनंतपणाची
जीवनभराची साथ आहे.


मी म्हणालो-
जीवन म्हणजे शोकांतिका..
रात्रींचा आक्रोश,
दिवसाची आकांतिका
स्वप्नांचे चुरगळणे,
मनाची आक्रोशिका.
दु:खाचे अनंतपण,
आयुष्याची एकांतिका !


त्याही पलीकडे तो म्हणतोय-
जीवन म्हणजे एक आभास !

जन्ममृत्यूचे धृव सांधणारा
जीवन म्हणजे एक व्यास...
संचिताचे राहिलेले
फेडण्याची एक आस.
आत्म्याचे अनंतपण तरीही
शून्याचाच ध्यास !

-डॉ.सुनील अहिरराव
(पूर्वप्रकाशित- गावकरी, नाशिक )

गुरुवार, १५ मार्च, २०१२

कैफ

हे पाहणे नि हासणे : हा प्रेमाचा खेळ आहे ,
की वासनांनी मनाशी घातलेला मेळ आहे?

खोल खोल रुतणारा कैफ उतू येत आहे,
मला माझ्या देहामध्ये चीणूनिया जात आहे.

कण कण छेदणारे हे प्रेमाचे तेज आहे,
की अंधार वेढणारे वासनेचे बीज आहे?

नाते तसे काही नाही, जोडताना 'ना'ही नाही

जोडूनही सारे काही, सोबतीला कुणी नाही...

नागिणीचे निश्वास हे श्वासामध्ये पेटलेले
अंगामध्ये जणू लक्ष निखारेही गोठलेले..

अंत याचा कळतो ना! कळूनही वळतो ना!
जाणीवाही संपताना कैफ मात्र ढळतो ना!

दूरदूर त्या तिथे उमटते सत्य आहे:
जीवनेही संपतात..इथे फक्त कैफ आहे!

                      डॉ. सुनील अहिरराव
           ( पूर्वप्रकाशित दै. गावकरी नाशिक दि. २०/०७/१९९४)

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

एक पोकळी : एक आकाश

एक पोकळी: एक आकाश
स्वतःपुरता एक अंधार...
रक्तिम ओल्या दलदलीतून
स्फुरत जातो एक आकार ..

स्वतःपुरती बंदिशाळा
एक दिशाहीन नाजूक वळवळ
रक्तमांस प्रवाहातून
जागत जाते एक धडपड ...

एक पोकळी एक प्रकाश
परके असे एक आकाश
ओल्या हळव्या हिरवळीवर
सरपटणारे खोल श्वास ..

एक सत्ता : एक संग्राम
स्थित्वासाठी एक झंकार !
एक प्रवाह: रक्तप्रलय
विरत जाती सारे आकार...

एक पोकळी : एक अंधार
निर्विकार - एक आकाश
एक साधना ,एक तपस्या
अनंततेचा एक ध्यास...

एक शय्या : एक क्षितीज
हरवणारे तिमीरबिंब ,
एक तेज शाश्वत सत्य
उमलणारे प्रकाशबिंब !
-डॉ. सुनील अहिरराव

(पूर्वप्रसिद्धी: लोकमत )

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

गिधाडे

त्यांनी तुजला स्वार्थासाठी
पीयूषाचे अभिषेक केले -
स्तन्य आटल्या भिकारणीचे
मुल कुशीतच मरून गेले...

तुझ्या मस्तकीं सांडलेले
पियुष अधाशी धरणीवरचे
शोषित गेले एक जीवन
लाचार एका माणुसकीचे

तुझिया नेत्री प्रसन्नतेची
छटा ओलसर दिसू लागली,
त्यांच्या स्वार्थी डोळ्यामध्ये
पुन्हा गिधाडे फिरू लागली...!
   डॉ.सुनील अहिरराव

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

जीवनाच्या कणाकणाचा मीच साक्षी...

..जीवनाच्या कणाकणाचा मीच साक्षी !

dr.sunil_ahirrao | 6 June, 2011 - 13:35

कितीक आली आणि गेली
पाखरे गोंदून नक्षी ,
जीवनाच्या आकाशाचा
एक माझा मीच साक्षी !

कितीक वाहिले वादळवारे,
कितीक तुटूनी पडले तारे,
आकाशही कोसळले सारे...
वेदनेच्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

सुखामध्ये आतुर झालो,
दुखा:मध्ये कठोर झालो,
भावनेला फितूर झालो…
भरकटलेल्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

हारलो नाही ,जिंकलो नाही,
बे-ईमान विकलो नाही,
कर्तव्याला मुकलो जरि,
निर्णयाच्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

ग्रीष्मामध्ये वठलो नाही,
शिशिरात गोठलो नाही
वसंतात फुललो न जरि,
फुललेल्या त्या स्वप्नांचा मीच साक्षी!

मला येथली प्रीत न कळली,
जगण्यामधली रित न वळली,
विरले जीवनगीत जरि,
छेडलेल्या त्या सुरांचा मीच साक्षी!

मला न कळले जगण्यामधले
जळकट अर्थ,
मला न वळले समिधांमधले
कळकट स्वार्थ,
जळणे मला जमले न जरि,
जळणाऱ्या त्या मनांचा मीच साक्षी!

जन्म अनंत जरि न पाहिले,
मरण अनंत जरि न साहिले,
क्षणात विरून गेलो तरीहि
जीवनाच्या कणाकणाचा मीच साक्षी!
-डॉ.सुनील अहिररावhttp://www.maayboli.com/node/26337

प्रीत


प्रीत

ओंजळीत सूर्य घे,
एक नवी रात कर.
भंगल्या साऱ्या दिशा
श्वासातून एक कर
.
रात्रीच्या चांदण्यात
स्वप्नांचा हात धर;
अधरांच्या ज्योतीवर
जरा माझी प्रीत धर
http://www.maayboli.com/node/26283!
- डॉ.सुनील अहिरराव

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

रक्तराग

रक्तराग

रक्तपुष्प पानातले,
तू दिलेले
आज जरी आहे सुकलेले,
गंध तयाचा
श्वासामधुनी अजून ताजा,
श्वास जरी येथे थकलेले...

तुझिया नाजूक
रेशीम अधरांनी,
आणि गंधित मदश्वासांनी
माझ्या श्वासावरती लिहिले
गीत गुलाबी मुसमुसलेले,
कणाकणात रक्तराग वाहिले...

-डॉ.सुनील अहिरराव