बुधवार, २८ मार्च, २०१२

रक्तबंधन

पिढ्यापिढ्यांतून अस्तित्वाच्या वहात येतो रक्तप्रवाह
दलदलीतून प्रवृत्तींच्या नहात येतो रक्तप्रवाह

गाळ तळाशी टाकून देणे अजून त्याला जमले नाही,
पूर्णत्वाने सांडून जाणे अजून त्याला गमले नाही

क्षणक्षणाने कणाकणाला भारीत जातो रक्तप्रवाह
कणाकणाने क्षणाक्षणाला पेरीत जातो रक्तप्रवाह

हळवेपण वाहतो कधी, कधी केशरी भडक रक्त
कधी विसरुनी नाती गोती ,सांडित जातो अपुले रक्त

प्रवाहातील हा दोष नाही, आहे फक्त स्वभावस्पंदन
प्रवाहाला हा शापही नाही, आहे केवळ रक्तबंधन !

_ डॉ. सुनील अहिरराव
पूर्वप्रकाशित : दै. गावकरी ,नाशिक

फिनिक्स

भावनांतील दुबळा गुंता आपणालाच गुंतवू जातो
तुटली स्वप्नं, किनारा छिन्न- आपणासवे वाहून नेतो


वाहतो असे: पागल पिसे ,कणाकणाला विखरु जातो
सांडती कण नुरते भान, अज्ञातातील प्रदेश येतो.


गहिरागार गूढ अंधार  : अस्तित्वातील अर्थ सांगतो
राखेतून या  कलेवराच्या जीवनसाक्षी फिनिक्स होतो !


- डॉ.सुनील अहिरराव
पूर्वप्रकाशित (सकाळ,नाशिक )

शुक्रवार, २३ मार्च, २०१२

रक्तक्रंदन

कणाकणाचे साहून क्रंदन, गतकाळाचे तोडून बंधन
काळ धावतो अपुल्या वेगे, गर्भक्षणाचे जोडून बंधन

क्षण एकेक तुटत जातो ,कालौघातून सुटत जातो,
स्वतः रेखिल्या दिशांत केव्हा, स्वतःच आणि विरून जातो...

विरून गेल्या श्वासांच्याही, हरवलेल्या दिशांच्याही,
काळावरती खुणा ठसती, स्वप्नामधल्या आशांच्याही.

गर्भक्षणाची रेखित गती ,कणाकणाची जपत स्मृती,
काळ असाच जात राहतो , अवशेषांना देत सोबती.

पुन्हा एकदा अवशेषांतून फुलून येते नवीन जीवन
काळाच्या अन कणाक्षणावर पुन्हा एकदा रक्तक्रंदन...!

_डॉ.सुनील अहिरराव
पूर्वप्रकाशित-रविवार सकाळ 
७ मे १९९५ नाशिक

बुधवार, २१ मार्च, २०१२

डायरी

आजवर
तू खूप सहन केलंस-
माझं सारं दु:ख
साठवून ठेवलंस
तुझ्या पानापानांवर...

मी
इतरांच्या
तनामनावर गोंदलेली
सुखंसुद्धा
पुसून गेलीत....

शनिवार, १७ मार्च, २०१२

वादळ

वादळ येते :
आकांतासह विरून जाते.
आणि शांतता:
वादळाला पेरून जाते !

वादळ म्हणजे
प्राक्तनाचा जहरी फास...
आणि शांतता:
आयुष्याचा उसना श्वास !

_डॉ. सुनील अहिरराव

शुक्रवार, १६ मार्च, २०१२

जीवन

तू म्हणालीस -
जीवन म्हणजे मौज आहे.
रात्रीच्या चांदण्याची झालर लेवून
प्रत्येक दिवस येत आहे.
स्वप्नावर स्वप्न फुलते आहे,
मनाच्या झुल्यावर झुलते आहे.
आनंदाच्या अनंतपणाची
जीवनभराची साथ आहे.


मी म्हणालो-
जीवन म्हणजे शोकांतिका..
रात्रींचा आक्रोश,
दिवसाची आकांतिका
स्वप्नांचे चुरगळणे,
मनाची आक्रोशिका.
दु:खाचे अनंतपण,
आयुष्याची एकांतिका !


त्याही पलीकडे तो म्हणतोय-
जीवन म्हणजे एक आभास !

जन्ममृत्यूचे धृव सांधणारा
जीवन म्हणजे एक व्यास...
संचिताचे राहिलेले
फेडण्याची एक आस.
आत्म्याचे अनंतपण तरीही
शून्याचाच ध्यास !

-डॉ.सुनील अहिरराव
(पूर्वप्रकाशित- गावकरी, नाशिक )

गुरुवार, १५ मार्च, २०१२

कैफ

हे पाहणे नि हासणे : हा प्रेमाचा खेळ आहे ,
की वासनांनी मनाशी घातलेला मेळ आहे?

खोल खोल रुतणारा कैफ उतू येत आहे,
मला माझ्या देहामध्ये चीणूनिया जात आहे.

कण कण छेदणारे हे प्रेमाचे तेज आहे,
की अंधार वेढणारे वासनेचे बीज आहे?

नाते तसे काही नाही, जोडताना 'ना'ही नाही

जोडूनही सारे काही, सोबतीला कुणी नाही...

नागिणीचे निश्वास हे श्वासामध्ये पेटलेले
अंगामध्ये जणू लक्ष निखारेही गोठलेले..

अंत याचा कळतो ना! कळूनही वळतो ना!
जाणीवाही संपताना कैफ मात्र ढळतो ना!

दूरदूर त्या तिथे उमटते सत्य आहे:
जीवनेही संपतात..इथे फक्त कैफ आहे!

                      डॉ. सुनील अहिरराव
           ( पूर्वप्रकाशित दै. गावकरी नाशिक दि. २०/०७/१९९४)