शनिवार, २७ जुलै, २०१३

रात्र

तेव्हाही
तू दिला नाहीसच
कोसळत्या नात्याला शब्दांचा आधार
एकदमच सारे पाश न सुटलेल्या
कोड्यासारखे अस्ताव्यस्त,  अपंग.
शेवटची ताटातूट झाल्यावर
आतून एकेक पिळ सुटला
सापासारखा वेडावाकडा फाटला !
कणाकणात विषाचे अघोरी नर्तन
ब्ल्याकहोलमध्ये कोसळावे
तसे आभासांचे भयाण चिंतन..
आणि मेंदुवरून जाणारी ठोकळ्यासारखी बद्द रात्र !

       - डॉ.सुनील अहिरराव

रविवार, २१ जुलै, २०१३

ठोकळे


ठोकळे, ठोकळ्यांचा समूह,  मग आख्खा एक  ठोकळा
किंवा
आख्खा ठोकळा, ठोकळ्यांचा समूह आणि किरकोळ ठोकळे : एकूण एकच.

लाल ठोकळ्यातून उतरलास की काळापिवळा थांबव
शंभरची पत्ती दाखव
 दिली नाहीस तर तो भाव खाणार
रिंकाम्या खिशाने बोंबलत  पुढे जाणार
एरवी दहावीसचा धंदा ; पण आता नाही, तर कधी कमावणार ?

 उजवीकडे मोठे भुयार
मग भुयारात भुयार !
आणि
मग तिथे ठोकळेच ठोकळे, ठोकळ्यात ठोकळे
काळे ठोकळे , पांढरे ठोकळे , खाकी ठोकळे ,
मळकट,कळकट, ठिसूळ आणि बळकट
लहान, मोठे, उंच आणि बुटके ; गब्बर आणि फाटके ठोकळे


एकदाचे तुझे भुयार शोध
सापडले ? नशीब समज !
आपले न परतीचे भुयार सापडणे  हाच जीवनाचा उद्देश
हाच शिक्षणाचा फायदा ;
अडाण्याला कसला कळतो आणि वळतो कायदा ?

आता हळूच कानोसा घे ,आवाज नको करुस
हे तुझ्या बापाचे नाट्यगृह नाही किंवा पिरबाबाचा उरूस
घाई नको थांब ; आधी मोबाईलचा गळा दाब  !
लिहिणाऱ्या ठोकळ्याला निरोप दे ; नावाचा तुझ्या पुकारा घे
शंभरची पत्ती त्याच्या घशात घाल
आणि  ठोकळ्यांचा खेळ पहा-
काळे -पांढरे ठोकळे ,पांढरे ठोकळे, निव्वळ काळे ठोकळे ,किरकोळ ठोकळे
उभे आणि बसलेले , घुसलेले  आणि फसलेले
लिहिणारे , बडवणारे , पुकारणारे
बाजू मांडणारे ,खोडणारे, तराजुला वारंवार हादरे देणारे,
सत्याचा गळा घोटणारे
युक्तीवादी ठोकळे !



आणि हा निव्वळ काळा ठोकळा  :
याच्या अंगाला हजार डोळे;पण डोळ्यांच्या ठिकाणी खोबण
हा कधी कधी मुका आणि बहिरा सुद्धा !
याच्या तराजूत वजन टाक , भावना घाल चुलीत
अशुभ रडू ,भेकू नकोस:
साला, सकाळी सकाळी अपशकून नको !
गुमान बाजूला ये आणि आणखी एक पत्ती दे, पुढची तारीख घे
बोल पटकन, कन्नी काट, पुढच्या तारखेला आहेच गाठ
नाहीतर मग साडेपाच पर्यंत थांब
फरक काय पडणार राजा , तुझीच रोजीरोटी बुडेल ; तुलाच जायचे आहे लांब !


पुन्हा काळा पिवळ्या ठोकळ्यात बस
शंभरची पत्ती दे
आता लाल ठोकळा शोध 
जीवतोड धावत; खिडकी पकड
आता निवांत हे धावणारे ठोकळे पहा ..!

- डॉ. सुनील अहिरराव


गुरुवार, ११ जुलै, २०१३

भिंत


आधी आपण वाळूवर घर बांधले
खेळता खेळता,
तू मोडून टाकलेस !
नंतर आपण हवेत स्वप्न बांधले
तू हलकेच फुंकर टाकलीस;
पत्त्यासारखे कोसळले !
आता
तुझ्या माझ्या आकाशाच्या मध्यभागी
आपण एक कडेकोट भिंत बांधू
!

- डॉ. सुनील अहिरराव

सोमवार, ८ जुलै, २०१३

शोध

तू माझ्यात शोधलेस आकाश ,चंद्र ,सूर्य ,तारे.
पर्वत ,नद्या, समुद्र, वादळे.
शोधलेस अश्रुंनी ओसंडुन वाहणारे भयाण प्रपात ,
वेदनांचे निबिड अरण्य,
आणि अंतर्बाह्य धगीने पोळलेले दिशाहीन वाळवंट...
तू शोधलास स्वप्नांनी लखलखता मय़ुरपंखी अंधार,
फुलांच्या पापणीत लपलेला वसंत ,
उजाड ओसाड क़ाटेऱी ग्रीष्म !
नंतर तू शोधलास देव, दगड, आणि दानव !
तू शोधत राहिलीस तुझ्या शोधाचे न संपणारे क्षितिज ;
तू मला शोधलेच नाही... !

मेंदू

विचार असे ...मग़ तसे आणि कसेही..
इथे -तिथे ,घऱात , रस्त्यात , ऑफिसात भुणभूण  ;
मेंदू नुसता ठसठसतो !
कायच्या काय अंतर्बाह्य घुसळण.
प्रवास कुठुन कुठे .. कुठेच्या कुठे.
कसलेकसले मेंदूइतके क्लिष्ट संद
र्भ:
धुसर, गडद ,काळे, निळे ,हिऱवे ,भगवे;
धावून येतात
अंगावर !
दीर्घ युद्धातली वाताहत झाल्यावर
अखेर तू भेटतेस :

विचार तिथेच अडतात, गुंततात ,
विसाव्याला थांबतात ...!
मी शिणलेला मेंदु टेबलावऱ काढुन ठेवतो !
- डॉ. सुनील अहिरराव

रविवार, ७ जुलै, २०१३

श्राद्ध

...आता एक घाव दोन तुकडे केल्यावर,
आपापल्या वाट्याचा रक्तबंबाळ तुकडा
जगापासुन लपवणे आलेच !
सोबत ठिबकणाऱ्या आठवांचा ओला हुंदका
आतल्याआत पोसणे आलेच..
य़ापेक्षा
जपली असतीस नात्याची अडखळती धडधड,
दिले असतेस थोडे श्वास ,
फुंकला असतास थोडा प्राण !
अगदिच वटवृक्ष झाला नसता,
खुरटेच ऱाहिले असते झाड ...तरिही ,ते फक्त तुझे नि माझे !
... आता
य़ा कलेवऱाचे दरक्षणी श्राद्ध करणे आलेच...!

- डॉ. सुनील अहिरऱाव

शुक्रवार, २१ जून, २०१३

युग

मी हे लिहून काढतो
मग ते लिहितो ,मग आणखीन ते ..
त्या त्या क्षणाचे , वर्षांचे ,जन्मान्मांचे संदर्भ !
कधी कधी शब्द फारच पोचट वाटू लागतात ,
मग मी कागद चुरगाळून फेकून देतो

असेलही कदाचित त्या चुरगाळून गेलेल्या ओळींत
एखादा निखाऱ्यासारखा जळजळीत शब्द,
मनाचा एखादा कापून काढलेला तुकडा
एखादा वाळवंटासारखा तप्त अश्रू
आणि तुझ्या आठवणीत वाहून गेलेले कदाचित आख्ये एखादे युग .. !

रविवार, २६ मे, २०१३

जीव


 जीव दुखतो.. जीव खुपतो
जीव अनावर हुंद्क्यासारखा ओंजळीत लपतो
जीव जीवाला छळतो , माशासारखा तडफडतो
जीव कसायाने नुकत्याच कापलेल्या
ताज्या मांसाच्या तुकड्यासारखा तडतड उडतो !

जीव तुटतो, जीव स्वतःच्याच जीवावर उठतो
जीव धुमसत्या आठवणींनी उरातल्या उरात उभा आडवा फुटतो
जीव अर्ध्यात खुडतो, जीव खोल डोहात बुडतो
जीव आपल्याच  बेवारस कलेवरावर धुवांधार रडतो
जीव इथेतिथे सांडतो, जीव जीवाशीच भांडतो
जीव स्वतःच्याच विखुरलेल्या तुकड्यांना पुनःपुन: खांडतो !

जीव सुटतो , जीव स्वत:लाच विटतो :
जीव शिशिरामधल्या एकाकी झाडासारखा वठतो !
जीव आटतो, जीव फाटतो
जीव जीर्णशीर्ण धाग्यांसारखा तटातट तुटतो
जीव भरून येतो, जीव हरून जातो
जीव कुणालातरी जीव लावण्याच्या नादात एकाकी मरून जातो
जीव वेडा होतो , थोडा थोडा होतो..
जीव तुझ्या जन्मभराच्या प्रतीक्षेसाठी डोळ्यात गोळा होतो..

- डॉ. सुनील अहिरराव

बुधवार, ८ मे, २०१३

स्वप्न

कुठून कसे, खोलवर दाटून येतात आवेग !
गात्रांतून उसळणाऱ्या बेभान लाटांवर स्वार वादळाचे अश्व उधळतात,
कणाकणात सप्तरंगी नक्षीचे भरते;
आभासांच्या मोहक्षणाचे वर्तुळ !

आकाशवेधी आदिम,
गुढरम्य दिशांच्या सावलीत फुललेली आकाशगंगा !
मस्तकात स्पंदणारा रक्तिम विजेचा लोळ !
इथेही तिथेही - अनंताच्या सिमारेषांवर
संधीप्रकाशस्थ अलवार स्वप्न !

-डॉ. सुनील अहिरराव

शुक्रवार, २२ मार्च, २०१३

रक्तरेषा

वेळीअवेळी
आकाश
नुसतेच दाटून येते
एकदाचे हमसून बरसत नाही.
लेखणी कुंद कुंद :
नुसतीच ठिबकते ; झरत नाही.
रक्तरेषा :
उभ्या, आडव्या, तिरप्या

भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार
कागदाच्या काळजात धारदार ..
असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी...!

 डॉ. सुनील अहिरराव

गुरुवार, २१ मार्च, २०१३

बुर्खा

रेक माणूस नागमोडी
कुणीच नाही सुतासारखा
सुरी तयाच्या बगलेमध्ये
जरी दिसे हा दुतासारखा !

बुर्ख्यामध्ये दंतकथेच्या
हरेक किस्सा मृतासारखा
गळ्यास येता : विचारवंत
बनून जातो बुतासारखा !

मृदेत किल्ला कशास् बांधा
विरून जातो मुतासारखा
फिरून व्योमी तिथेच येतो
जन्म असा हा भुतासारखा !
- (C) डॉ.सुनील अहिरराव

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

शब्द

पूर्वी
शब्द ओथंबलेले , तप्त , अनावर , अलवार :
अलगद तुझ्या गालावरून अश्रूंसारखे ओघळणारे  ..
ते हलकेच टिपून घेताना त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या धगीतून घट्ट दाटून यायचे आवेग,
आणि जीव चिंब ओला व्हायचा !
असे असंख्य क्षण तुझ्या माझ्या शब्दांनी आसमंतावर कोरून ठेवलेले :
आजही कुठे कुठे त्यांच्या अवशेषांच्या खुणा विखुरलेल्या...!
अवशेष !   किती भयाण शब्द वाटतो !
पण
मनाचा एकेक दगड निखळून गेल्यावर,
वादळांत हरवलेल्या एकाकी  वाटांवर
कुठवर तग धरणार कुणाच्याही सोबतीविना ?
आताशा
दाटून आलेले आभाळ पूर्वीसारखे गदगदून सांडत नाही; आता ती हवीहवीशी धग  नाही,
आता शब्द म्हणजे  म्हणजे जलाबाहेर काढलेल्या मत्स्याची  तडफड फक्त ! 
तसेही रोज कितीदा मरावे आणि रडावे आपण स्वत:च्याच कलेवरावर,  उर फुटेस्तोवर !
कितींदा सांडावे स्वत:लाच इथे -तिथे -
आणि मग वेचत फिरावा  रानोमाळ स्वत:च्याच अस्तित्वाचा एकेक तुकडा : हा माझा की तो ?

- डॉ. सुनील अहिरराव