रविवार, २६ मे, २०१३

जीव


 जीव दुखतो.. जीव खुपतो
जीव अनावर हुंद्क्यासारखा ओंजळीत लपतो
जीव जीवाला छळतो , माशासारखा तडफडतो
जीव कसायाने नुकत्याच कापलेल्या
ताज्या मांसाच्या तुकड्यासारखा तडतड उडतो !

जीव तुटतो, जीव स्वतःच्याच जीवावर उठतो
जीव धुमसत्या आठवणींनी उरातल्या उरात उभा आडवा फुटतो
जीव अर्ध्यात खुडतो, जीव खोल डोहात बुडतो
जीव आपल्याच  बेवारस कलेवरावर धुवांधार रडतो
जीव इथेतिथे सांडतो, जीव जीवाशीच भांडतो
जीव स्वतःच्याच विखुरलेल्या तुकड्यांना पुनःपुन: खांडतो !

जीव सुटतो , जीव स्वत:लाच विटतो :
जीव शिशिरामधल्या एकाकी झाडासारखा वठतो !
जीव आटतो, जीव फाटतो
जीव जीर्णशीर्ण धाग्यांसारखा तटातट तुटतो
जीव भरून येतो, जीव हरून जातो
जीव कुणालातरी जीव लावण्याच्या नादात एकाकी मरून जातो
जीव वेडा होतो , थोडा थोडा होतो..
जीव तुझ्या जन्मभराच्या प्रतीक्षेसाठी डोळ्यात गोळा होतो..

- डॉ. सुनील अहिरराव

बुधवार, ८ मे, २०१३

स्वप्न

कुठून कसे, खोलवर दाटून येतात आवेग !
गात्रांतून उसळणाऱ्या बेभान लाटांवर स्वार वादळाचे अश्व उधळतात,
कणाकणात सप्तरंगी नक्षीचे भरते;
आभासांच्या मोहक्षणाचे वर्तुळ !

आकाशवेधी आदिम,
गुढरम्य दिशांच्या सावलीत फुललेली आकाशगंगा !
मस्तकात स्पंदणारा रक्तिम विजेचा लोळ !
इथेही तिथेही - अनंताच्या सिमारेषांवर
संधीप्रकाशस्थ अलवार स्वप्न !

-डॉ. सुनील अहिरराव

शुक्रवार, २२ मार्च, २०१३

रक्तरेषा

वेळीअवेळी
आकाश
नुसतेच दाटून येते
एकदाचे हमसून बरसत नाही.
लेखणी कुंद कुंद :
नुसतीच ठिबकते ; झरत नाही.
रक्तरेषा :
उभ्या, आडव्या, तिरप्या

भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार
कागदाच्या काळजात धारदार ..
असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी...!

 डॉ. सुनील अहिरराव

गुरुवार, २१ मार्च, २०१३

बुर्खा

रेक माणूस नागमोडी
कुणीच नाही सुतासारखा
सुरी तयाच्या बगलेमध्ये
जरी दिसे हा दुतासारखा !

बुर्ख्यामध्ये दंतकथेच्या
हरेक किस्सा मृतासारखा
गळ्यास येता : विचारवंत
बनून जातो बुतासारखा !

मृदेत किल्ला कशास् बांधा
विरून जातो मुतासारखा
फिरून व्योमी तिथेच येतो
जन्म असा हा भुतासारखा !
- (C) डॉ.सुनील अहिरराव

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

शब्द

पूर्वी
शब्द ओथंबलेले , तप्त , अनावर , अलवार :
अलगद तुझ्या गालावरून अश्रूंसारखे ओघळणारे  ..
ते हलकेच टिपून घेताना त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या धगीतून घट्ट दाटून यायचे आवेग,
आणि जीव चिंब ओला व्हायचा !
असे असंख्य क्षण तुझ्या माझ्या शब्दांनी आसमंतावर कोरून ठेवलेले :
आजही कुठे कुठे त्यांच्या अवशेषांच्या खुणा विखुरलेल्या...!
अवशेष !   किती भयाण शब्द वाटतो !
पण
मनाचा एकेक दगड निखळून गेल्यावर,
वादळांत हरवलेल्या एकाकी  वाटांवर
कुठवर तग धरणार कुणाच्याही सोबतीविना ?
आताशा
दाटून आलेले आभाळ पूर्वीसारखे गदगदून सांडत नाही; आता ती हवीहवीशी धग  नाही,
आता शब्द म्हणजे  म्हणजे जलाबाहेर काढलेल्या मत्स्याची  तडफड फक्त ! 
तसेही रोज कितीदा मरावे आणि रडावे आपण स्वत:च्याच कलेवरावर,  उर फुटेस्तोवर !
कितींदा सांडावे स्वत:लाच इथे -तिथे -
आणि मग वेचत फिरावा  रानोमाळ स्वत:च्याच अस्तित्वाचा एकेक तुकडा : हा माझा की तो ?

- डॉ. सुनील अहिरराव

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२

सिद्धांत

क्षणोक्षणी कणकण जगण्याची धडपड
तुझीही -माझीही ..
ढासळते आहे माती , निखळतो आहे एकेक दगड..
हलक्याशा आघातानंही कोसळत आहेत आतल्याआत
मनाच्या ठिसूळ झालेल्या असंख्य भिंती..
पत्त्यांचे बंगले हलक्याशा झुळुकेने कोसळावेत,
तितक्या सहजपणे विखुरून जातोय कणनकण..
त्याच त्या अवशेषांवर कितींदा उभारायचं स्वतःचं अस्तित्व ?
आशांचे अंधुक कवडसे मावळून गेलेले
स्वप्नांचे फिनिक्स फार मागेच राखेत कायमचे दफन झालेले,
तरीही ही कोणती धुगधुगी घेऊन जगतो आहोत ,
समजत नाही.
डार्विनचा सिद्धांत कितींदा सिद्ध करतो आपण
जगण्याच्या धडपडीतून आणि ती शमतानाही ... !
- डॉ. सुनील अहिरराव 

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

मुक्ती

जन्मासोबत मी घेऊन येतो
आयुष्याशी जन्मजन्मांतरीचे वैर आणि
आत्मघातांचे मयुरपंखी शाप.



तुझ्या कांकणांचे हळवे संगीत विरून गेल्यावर

क्षणाक्षणाला भोगतो मी माझे मरण.

मी पहुडतो स्मशानस्थ शांततेत

स्थितप्रज्ञासारखा माझ्याच सरणावर



आणि

आयुष्याच्या कणाक्षणाचा
सारा अंगार ओतून मीच मला जाळत राहतो
निमुटपणे मुक्तीची वाट पहात..

नंतर
तुझ्या आसवांची उष्ण गाथा
आणि तुझ्या थरथरत्या ओठांतील दु:खाचा अस्फुट उद्गार ,
शांततेच्या कणाकणाला छेदत जातो.

मी माझ्या ओठांनी हलकेच टिपून घेतो तुझी आसवे!
तुला ते कळतं की नाही, माहित नाही;
पण त्या सरत्या क्षणी मी पाहिलेले असतात
तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांचे मुक्त पक्षी !


डॉ.सुनील अहिरराव