सोमवार, १६ जुलै, २०१२

अंधार

अंधार..

सभोवती नितळ ,निखळ, काळाभोर अंधार ..
खिडक्यांचे आकाशी नेत्रही झाकलेले.
मी पीत राहतो
तिमिराचे बर्फाळ गहिरेपण आणि
साठवत राहतो माझ्या मनातील तारे निखळल्यानंतरचे रितेपण !



शांतता भिनत जाते

अंधाराच्या कणाक्षणात अंगभर, काही क्षण..


 मग काळजात लख्खकन् चमकून जातं धारदार पातं-


 तुझ्या चेहऱ्यावरील अंधारवस्त्र सारून 



मी न्याहाळतो
तुझे संगमरवरी वासनांतीत नग्न सौंदर्य..

तू ओथंबत्या नजरेने सामावून घेतेस मला माझ्या तिमीरछटांसह ,
 अलगद ; फुलपाखराला कवटाळावे तसे.
 विवस्त्र शांततेत तुझ्या कांकणांचे संगीत,
ओठांची थरथर 
 आणि श्वासांतील बेधुंद आवेग-
 तुझ्या रक्तात पाझरतात माझे रंग, गंध, श्वास आणि रक्तही..
 आपण वाहत राहतो एकमेकांत आपले स्वत्व
 आणि शोधत राहतो
 अद्वैत !

तुझ्या नकळत माझी स्वप्ने तुझी होतात
 अन् माझ्या डोळ्यात सप्तरंगी आभास येतात.
 सभोवती नितळ ,निखळ काळाभोर अंधार..

डॉ.सुनील अहिरराव

गुरुवार, २८ जून, २०१२

इष्टापदा

पोळलेल्या माणसांचे काय सांगू,
पेटल्या मंत्रालयाचे काय सांगू

वाद नाही, काय ते आक्रीत होते !
आपदा इष्टापदांचे काय सांगू

धड धडा ह्या फायली साऱ्या जळाल्या
गूढ होते काय त्याचे , काय सांगू

 सोडला नि:श्वास त्यांनी दाटलेला
 दैव  होते थोर त्यांचे , काय सांगू

वाचले ते नेमके होते पुढारी,
जीव गेले माणसांचे  ! काय सांगू

संविधाना,  झोप की हे सोंग यांचे 
मानभावी  लांडग्यांचे , काय सांगू
    _डॉ. सुनील अहिरराव

गुरुवार, ३१ मे, २०१२

एकटेपण

जेव्हा
आपलं असं कुणीही नसतं,
तेव्हा सोसता येतो एकटेपणा
एक अनिवार्य सत्य म्हणून !

आणि
साहता येतो
मनाच्या उदार भिंतींचा कोसळता आक्रोश
मनाच्याच सांदीकोपऱ्यात पिशाच्याप्रमाणे,
निर्विकार..

इथे
मनाच्या स्मशानात
स्तब्ध शांत काळोखात पेटत जाताहेत
आत्मघाती चिता -
अंधाराला डागण्या देत प्रसवताहेत
दु:खाची चिवट पिलावळ...

आताशा
तुझ्यामाझ्या मिसळत्या श्वासांतूनही
प्रकटत नाही अद्वैत !
होत नाही आताशा
तुझ्या ओठांच्या आणि डोळ्यांच्या सीमारेषेवरील सत्य , एक !

पापण्यांतील खाऱ्या पाण्यात
उरलीय नुसती धग;
नाही सोसवत आता
तुझ्या मिठीतले माझे एकटेपण ...!
_डॉ.सुनील अहिरराव

बुधवार, २८ मार्च, २०१२

रक्तबंधन

पिढ्यापिढ्यांतून अस्तित्वाच्या वहात येतो रक्तप्रवाह
दलदलीतून प्रवृत्तींच्या नहात येतो रक्तप्रवाह

गाळ तळाशी टाकून देणे अजून त्याला जमले नाही,
पूर्णत्वाने सांडून जाणे अजून त्याला गमले नाही

क्षणक्षणाने कणाकणाला भारीत जातो रक्तप्रवाह
कणाकणाने क्षणाक्षणाला पेरीत जातो रक्तप्रवाह

हळवेपण वाहतो कधी, कधी केशरी भडक रक्त
कधी विसरुनी नाती गोती ,सांडित जातो अपुले रक्त

प्रवाहातील हा दोष नाही, आहे फक्त स्वभावस्पंदन
प्रवाहाला हा शापही नाही, आहे केवळ रक्तबंधन !

_ डॉ. सुनील अहिरराव
पूर्वप्रकाशित : दै. गावकरी ,नाशिक

फिनिक्स

भावनांतील दुबळा गुंता आपणालाच गुंतवू जातो
तुटली स्वप्नं, किनारा छिन्न- आपणासवे वाहून नेतो


वाहतो असे: पागल पिसे ,कणाकणाला विखरु जातो
सांडती कण नुरते भान, अज्ञातातील प्रदेश येतो.


गहिरागार गूढ अंधार  : अस्तित्वातील अर्थ सांगतो
राखेतून या  कलेवराच्या जीवनसाक्षी फिनिक्स होतो !


- डॉ.सुनील अहिरराव
पूर्वप्रकाशित (सकाळ,नाशिक )

शुक्रवार, २३ मार्च, २०१२

रक्तक्रंदन

कणाकणाचे साहून क्रंदन, गतकाळाचे तोडून बंधन
काळ धावतो अपुल्या वेगे, गर्भक्षणाचे जोडून बंधन

क्षण एकेक तुटत जातो ,कालौघातून सुटत जातो,
स्वतः रेखिल्या दिशांत केव्हा, स्वतःच आणि विरून जातो...

विरून गेल्या श्वासांच्याही, हरवलेल्या दिशांच्याही,
काळावरती खुणा ठसती, स्वप्नामधल्या आशांच्याही.

गर्भक्षणाची रेखित गती ,कणाकणाची जपत स्मृती,
काळ असाच जात राहतो , अवशेषांना देत सोबती.

पुन्हा एकदा अवशेषांतून फुलून येते नवीन जीवन
काळाच्या अन कणाक्षणावर पुन्हा एकदा रक्तक्रंदन...!

_डॉ.सुनील अहिरराव
पूर्वप्रकाशित-रविवार सकाळ 
७ मे १९९५ नाशिक

बुधवार, २१ मार्च, २०१२

डायरी

आजवर
तू खूप सहन केलंस-
माझं सारं दु:ख
साठवून ठेवलंस
तुझ्या पानापानांवर...

मी
इतरांच्या
तनामनावर गोंदलेली
सुखंसुद्धा
पुसून गेलीत....