मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

क्षण कोसळते...

कोण कुठल्या क्षणांचे क्षणाक्षणाला बदलणारे अनंत संदर्भ मेंदूत भरून जगत असतो आपण ! कुठून कसा ,कुठला क्षण कालौघातून ओघळेल आणि कोसळेल आपल्यावर, सांगता येत नाही. त्या क्षणाच्या कोसळण्यावर आपल्या अस्तित्वाचा डोलारा उभा असतो. तो कोसळेपर्यंत वाट पाहणे इतकेच आपल्या  हाती... इथेच आशा नव्याने जन्म घेत जाते. त्या येणाऱ्या क्षणात कदाचित असणार असतो आपले कोसळते अस्तित्व सांभाळणारा एक दीपस्तंभ ! मात्र एक निश्चित की त्या त्या क्षणांना आपण रोखू शकत नाही. .पुन्हा नव्या संदर्भांचे ओझे घेऊन एक प्रवास सुरु राहतो ... त्या त्या क्षणांच्या कोसळण्याची वाट पाहणे इतकेच आपल्या हाती ! त्याने जे दान तुम्हाला दिले ,ते निमुटपणे स्वीकारण्याशिवाय पर्याय तरी कोणता ?

सुखाला जसे विविध रंग असतात, तसेच दु:खाच्याही अनंत छटा... ! प्रत्येकाचं दु:ख मोठं  आणि परद:ख शीतलं ..आपल्या दु:खाला श्रोता मिळू शकतो पण आपल्या स्वतःशिवाय दुसरा सोबती मिळत नाही. ती तीव्रता आपली आपण भोगायची : कधी सुन्न,बधीर व्हायचं; कधी हुंदके देऊन रडायचं, कधी निगरगट्टपणे कोरडेपणाने आपल्याच दु:खावर भीषण हसायचं ! आपल्या इवल्या डोळ्यांइतकच आपलं आकाश...त्यात जमतील तशा वेड्यावाकड्या रेषा आखायच्या.  काही आकृत्या ,चित्रे रेखाटायची..ती सुद्धा अंगावर धावून येणारी..त्याच एब्स्ट्राक्ट आकारांत हरवून जायचं आणि त्याच त्या रेषांच्या रिंगणात फिरत रहायचं दरक्षणी कोसळत्या नव्या क्षणाच्या प्रतीक्षेत ! सगळंच म्हटलं तर आखीवरेखीव म्हटलं तर सगळंच विस्कळीत ...

असे असंख्य गुंते आणि त्यांची वेडीवाकडी भेंडोळी जमा करत चाललो आहोत आपण. कधी सुटलेच गुंते तर - वरवरचे वाटतात सुटल्यासारखे ; बहुधा हे सुद्धा तितकेसे खरे नाहीच ! एक धागा उकलताना नकळत त्याचा एक नवा गुंता ,एक नवे भेंडोळे तयार होते. आयुष्य म्हणजे साऱ्या क्षणांच्या संदर्भाचं एक मोठं भेंडोळं आणि आपण त्यात अडकलेले क्षुद्र जीव. अचानक हे धागे कधी स्वतःच उकलले जातातही ... क्षणांचे, वर्षांचे संदर्भ उलटून गेल्यावर नामोनिशाणही उरत नाही. ही उकल होण्यासाठी पुन्हा त्या क्षणाच्या कोसळण्याची वाट पाहणे ; मात्र ती तशी होणे न होणे त्या त्या क्षणावर अवलंबून... ! त्या क्षणाच्या बरसल्यानंतरचा प्रतिक्रियेचा क्षण तरी आपला असतो का, प्रश्नच आहे कारण एखादा  क्षण कोसळताना मिटवून जातो  आपलं असणं, तेव्हा पुढचा क्षण वाट्याला येत नाहीच...मग एक अनंत प्रवास अपरिहार्यपणे...

- डॉ. सुनील अहिरराव