मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

शब्द

पूर्वी
शब्द ओथंबलेले , तप्त , अनावर , अलवार :
अलगद तुझ्या गालावरून अश्रूंसारखे ओघळणारे  ..
ते हलकेच टिपून घेताना त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या धगीतून घट्ट दाटून यायचे आवेग,
आणि जीव चिंब ओला व्हायचा !
असे असंख्य क्षण तुझ्या माझ्या शब्दांनी आसमंतावर कोरून ठेवलेले :
आजही कुठे कुठे त्यांच्या अवशेषांच्या खुणा विखुरलेल्या...!
अवशेष !   किती भयाण शब्द वाटतो !
पण
मनाचा एकेक दगड निखळून गेल्यावर,
वादळांत हरवलेल्या एकाकी  वाटांवर
कुठवर तग धरणार कुणाच्याही सोबतीविना ?
आताशा
दाटून आलेले आभाळ पूर्वीसारखे गदगदून सांडत नाही; आता ती हवीहवीशी धग  नाही,
आता शब्द म्हणजे  म्हणजे जलाबाहेर काढलेल्या मत्स्याची  तडफड फक्त ! 
तसेही रोज कितीदा मरावे आणि रडावे आपण स्वत:च्याच कलेवरावर,  उर फुटेस्तोवर !
कितींदा सांडावे स्वत:लाच इथे -तिथे -
आणि मग वेचत फिरावा  रानोमाळ स्वत:च्याच अस्तित्वाचा एकेक तुकडा : हा माझा की तो ?

- डॉ. सुनील अहिरराव

२ टिप्पण्या:

  1. असा मृत्यू ? कि कदाचित आपलाच अट्टाहास / हट्ट असतो आत्म हत्येचा ?

    उत्तर द्याहटवा
  2. आत्मघात/ आत्महत्या हा कवितेचा विषय नाही.. परिस्थितीने लादलेली ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. नाहीतरी आपण स्वतःसाठी असे कितीसे जगतो ? आपण आपल्या प्रियजनांत, मित्रांत , इथल्या सुखदु:खांत सगळीकडे विखुरले गेलो आहोत. या विखुरलेपणाची जाणीव होणे,हे जसे ज्ञानाच्या मार्गाने टाकलेले पुढचे पाऊल असते, ते तितकेच क्लेशदायक सुद्धा असते. सर्वसामान्य माणसाला कदाचित हे सर्व सहन करण्याची क्षमता नसते. आणि यातून बाहेर पडण्याचा मार्गही नसतो. हे सारे घडताना मनाची असह्य घुसमट होते !

    उत्तर द्याहटवा