रविवार, २१ जुलै, २०१३

ठोकळे


ठोकळे, ठोकळ्यांचा समूह,  मग आख्खा एक  ठोकळा
किंवा
आख्खा ठोकळा, ठोकळ्यांचा समूह आणि किरकोळ ठोकळे : एकूण एकच.

लाल ठोकळ्यातून उतरलास की काळापिवळा थांबव
शंभरची पत्ती दाखव
 दिली नाहीस तर तो भाव खाणार
रिंकाम्या खिशाने बोंबलत  पुढे जाणार
एरवी दहावीसचा धंदा ; पण आता नाही, तर कधी कमावणार ?

 उजवीकडे मोठे भुयार
मग भुयारात भुयार !
आणि
मग तिथे ठोकळेच ठोकळे, ठोकळ्यात ठोकळे
काळे ठोकळे , पांढरे ठोकळे , खाकी ठोकळे ,
मळकट,कळकट, ठिसूळ आणि बळकट
लहान, मोठे, उंच आणि बुटके ; गब्बर आणि फाटके ठोकळे


एकदाचे तुझे भुयार शोध
सापडले ? नशीब समज !
आपले न परतीचे भुयार सापडणे  हाच जीवनाचा उद्देश
हाच शिक्षणाचा फायदा ;
अडाण्याला कसला कळतो आणि वळतो कायदा ?

आता हळूच कानोसा घे ,आवाज नको करुस
हे तुझ्या बापाचे नाट्यगृह नाही किंवा पिरबाबाचा उरूस
घाई नको थांब ; आधी मोबाईलचा गळा दाब  !
लिहिणाऱ्या ठोकळ्याला निरोप दे ; नावाचा तुझ्या पुकारा घे
शंभरची पत्ती त्याच्या घशात घाल
आणि  ठोकळ्यांचा खेळ पहा-
काळे -पांढरे ठोकळे ,पांढरे ठोकळे, निव्वळ काळे ठोकळे ,किरकोळ ठोकळे
उभे आणि बसलेले , घुसलेले  आणि फसलेले
लिहिणारे , बडवणारे , पुकारणारे
बाजू मांडणारे ,खोडणारे, तराजुला वारंवार हादरे देणारे,
सत्याचा गळा घोटणारे
युक्तीवादी ठोकळे !



आणि हा निव्वळ काळा ठोकळा  :
याच्या अंगाला हजार डोळे;पण डोळ्यांच्या ठिकाणी खोबण
हा कधी कधी मुका आणि बहिरा सुद्धा !
याच्या तराजूत वजन टाक , भावना घाल चुलीत
अशुभ रडू ,भेकू नकोस:
साला, सकाळी सकाळी अपशकून नको !
गुमान बाजूला ये आणि आणखी एक पत्ती दे, पुढची तारीख घे
बोल पटकन, कन्नी काट, पुढच्या तारखेला आहेच गाठ
नाहीतर मग साडेपाच पर्यंत थांब
फरक काय पडणार राजा , तुझीच रोजीरोटी बुडेल ; तुलाच जायचे आहे लांब !


पुन्हा काळा पिवळ्या ठोकळ्यात बस
शंभरची पत्ती दे
आता लाल ठोकळा शोध 
जीवतोड धावत; खिडकी पकड
आता निवांत हे धावणारे ठोकळे पहा ..!

- डॉ. सुनील अहिरराव


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा